मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत, ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. डिसेंबर 2024 महिन्यात, सरकारने 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली. आतापर्यंत महिलांना 6 हप्त्यांमध्ये एकूण 9000 रुपये मिळाले आहेत. आता, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सगळ्या महिलांचं लक्ष आहे.
डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम सरकारने 24 डिसेंबरपासून बँक खात्यात जमा करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळतील का?
महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान आश्वासन दिलं होतं की, लाडकी बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सरकारच्या अर्थसंकल्पानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता अर्थसंकल्प सादर झाल्यावर या हप्त्याच्या रकमेत वाढ होईल का हे बघावं लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी असं सांगितलं की, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांनी स्वतःहून आपलं नाव योजनेतून काढून घ्यावं. याआधी दिलेली रक्कम परत करण्याची गरज नाही. मात्र, जर नाव काढलं नाही, तर दंडासह रक्कम वसूल केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लाडक्या बहिणींची उत्सुकता
सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे आहे. सरकार लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करेल अशी अपेक्षा आहे.